पंजाब सरकार देणार पाकिस्तानला सडेतोड उत्तर; सीमावर्ती भागात अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात

पंजाब सरकारचं ठोस पाऊल; पाकिस्तानी ड्रोन घुसखोरी रोखण्यासाठी सीमेलगत अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात.
पंजाब सरकार देणार पाकिस्तानला सडेतोड उत्तर; सीमावर्ती भागात अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात

पंजाब: पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पंजाब सरकारने मोठं आणि ठोस पाऊल उचललं आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या भागात अलीकडे ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी व ड्रग्सच्या तस्करीच्या घटना वाढल्याने, पंजाब सरकारने आता सीमावर्ती भागात अत्याधुनिक अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार असून पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळेल, असे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पंजाबच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या मदतीने भारतात ड्रग्स, शस्त्रास्त्रं आणि अन्य संशयास्पद वस्तूंची तस्करी केली जात असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. या प्रकारांमुळे पंजाबची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आली होती. सीमावर्ती गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याला आता आळा घालण्यासाठी आणि पाकच्या कटकारस्थानांचा बंदोबस्त करण्यासाठी ही सिस्टीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा:भारताच्या दबदब्याने पाकड्यांची घाबरगुंडी; युद्धाच्या भीतीने मध्यरात्री पत्रकार परिषद

अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड

ही अँटी-ड्रोन सिस्टीम ड्रोनची उपस्थिती ओळखते, त्याचे स्थान निश्चित करते आणि आवश्यक तेव्हा ड्रोनला निष्क्रियदेखील करते. रात्रीच्या वेळीही कार्यक्षम असलेली ही प्रणाली आधुनिक कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे. सध्या सीमेलगतच्या गुरदासपूर, पठाणकोट, फिरोजपूर आणि अमृतसर अशा संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर तैनात करण्यात आली आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण सीमाभागात ही व्यवस्था लागू केली जाईल.

सीमेवरची सुरक्षा होणार अधिक मजबूत

या निर्णयामुळे पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन घुसखोरीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही दररोज रात्री ड्रोनची आवाजं ऐकत होतो, त्यामुळं भीतीचं वातावरण होतं. आता सरकारने योग्य पावलं उचलली आहेत.

राज्य सरकारचा ठाम निर्धार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्पष्ट केलं की, आमचं सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही कुरापतींना आता सडेतोड उत्तर दिलं जाईल. अँटी-ड्रोन सिस्टीम ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

नियंत्रणासाठी संयुक्त यंत्रणा सक्रिय

या योजनेअंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF), पंजाब पोलीस आणि गुप्तचर विभाग यांच्यात समन्वय वाढवण्यात आला आहे. ड्रोनद्वारे होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्षही उभारण्यात आला आहे. या यंत्रणेची नियमितपणे तपासणी व सुधारणा केली जाणार आहे, जेणेकरून कोणतीही त्रुटी राहणार नाही.

पंजाब सरकारच्या या निर्णायक पावलामुळे सीमाभागातील सुरक्षेला नवी दिशा मिळाली आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना आळा घालण्यासाठी आणि पंजाबमध्ये शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी ही अँटी-ड्रोन सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version