Pune Traffic Update : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्री विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी झाली आहे. मिरवणूक काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी व्यापक नियोजन आखले आहे. या अंतर्गत 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून संपूर्ण विसर्जन मिरवणूक पार पडेपर्यंत मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात शहरातील मुख्य रस्त्यांचे रूपांतर ‘नो व्हेईकल झोन’मध्ये केले जाणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
या मार्गांवरून फिरवावी लागणार वाहने
विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य दिवशी छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रोड, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता आणि केळकर रस्ता या मध्यवर्ती मार्गांवर वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. याव्यतिरिक्त टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रोड, जंगली महाराज रस्ता (JM Road), फर्ग्युसन कॉलेज रस्ता (FC Road), भांडारकर रस्ता आणि प्रभात रस्त्यावरील वाहतूक गरजेनुसार इतरत्र वळवली जाणार आहे. मध्यवर्ती पेठ भागात होणारी प्रचंड गर्दी पाहता स्थानिक नागरिकांनी आणि इतर प्रवाशांनी बाह्य रिंगरोड, मुख्य उड्डाणपूल आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या ‘डायव्हर्शन पॉईंट्स’चा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे.
हेही वाचा – Bank Closed : मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प राहणार;काय आहे कारण अन् कधी असणार बंद?
नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केल्यास कारवाई
गणेशोत्सव दर्शन आणि विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी अधिकृत वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मार्गावर किंवा आजूबाजूच्या गल्लीबोळात नो-पार्किंग क्षेत्रात वाहने आढळल्यास ती तात्काळ जप्त केली जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी मध्यवर्ती शहरात वैयक्तिक वाहने आणणे टाळावे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत नियमावलीची नोंद घेऊनच घराबाहेर पडावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.