पुणे: शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका वकिलाच्या कार्यालयात काम करणाऱ्या 32 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात वकिलाची पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे वैयक्तिक नात्यांबाबत निर्माण झालेला संशय कारणीभूत असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. मृत महिला पूनम मून या गेल्या साडेतीन वर्षांपासून संबंधित वकिलाच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. त्या नियमितपणे कामावर जात असत. 16 एप्रिल रोजीही त्या नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्या, मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्या न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंतेतून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
पूनम यांच्या पतीने संबंधित वकिलाशी संपर्क साधला असता त्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे. पुढील दिवशी सकाळी पती कार्यालयात गेले असता आतमध्ये भीषण दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. कार्यालयाच्या आत पूनम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. घटनास्थळी काही पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.प्राथमिक तपासात असे समोर आले की, वकिलाच्या पत्नीला पूनम आणि तिच्या पतीबाबत संशय होता. या संशयातूनच पत्नीने आपल्या मुलीच्या मदतीने पूनमवर हल्ला केल्याची शक्यता तपासली जात आहे. या घटनेत पूनम यांना गंभीर मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.या प्रकरणात वकिलाची पत्नी आणि मुलगी या मुख्य संशयित असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच संबंधित वकिलालाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर माहिती दडवणे, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणे आणि मृत महिलेच्या कुटुंबीयांची दिशाभूल करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.