देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. NEET पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे, त्यात या प्रकरणासंबंधी अनेक धागेदोरे समोर येत आहेत. दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेली आरोपी मनीषा हवालदार हिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणाचा म्होरक्या कोण होता आणि कोणाच्या इशाऱ्यावर तिने हे सगळ कृत्या केले त्याची देखील कबुली दिली आहे.
यावेळी सीबीआयने तिच्या घरावर छापा टाकल्यानंतर सीबीआयच्या हाती भौतिकशास्त्र विषयाच्या अनेक मूळ आणि संशयास्पद प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल आणि 60 हजार रुपयांची रोकड लागली. हे सर्व पुरावे जप्त केल्यानंतर चौकशीदरम्यान तिने हे देखील कबुल केले की, तिने परीक्षेच्या आधीच अनेक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळवून दिली होती.
म्होरक्याचं नाव सीबीआयच्या हाती
आपल्याला पेपर फोडायला लावणारा 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'च्या पॅनलमधीलच एका उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे मनीषा हवालदार हिने सांगितले आहे. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या संस्थेचेच्या अधिकाऱ्यांवर संशयाची टांगती तलवार आहे. मनीषा हवालदारने सीबीआयसमोर दिलेल्या जबाबानुसार, मनीषा हवालदारने हे गोपनीय प्रश्न मनीषा मांढरे नावाच्या एका महिलेला व्हॉट्सॲपवर पाठवले होते. यावेळी आपल्यावर कोणाचाही संशय येऊ नये यासाठी मनीषा हवालदारने मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघींसोबतचे पेपर फुटीबाबतचे चॅट्स आणि डेटा डिलीट केला होता.
नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबत संशयास्पद संवाद झाल्याचे सीबीआयला आढळून आले. त्यामुळे मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमध्ये तो "गॉड" कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान प्रश्नपत्रिका फुटीचा खरा ‘गॉडफादर’ कोण, याचा तपास वेगाने सुरू असून डिलीट करण्यात आलेल्या चॅट्समधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.