बीड : बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच मस्साजोग प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची समीक्षा केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे संकेत दिले आहेत. "तपास कुठपर्यंत गेला आहे आणि काय बाकी आहे, याबद्दल वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन विचारविनिमय करणार आहेत," असे नवनीत कॉवत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारताना नवनीत कॉवत यांनी बीड जिल्ह्यातील लोकांना दिलासा दिला. "गुन्हेगारी आणि इतर समस्यांशी लढण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, आणि बीडच्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन," असे ते म्हणाले.
तसेच, बीड जिल्ह्याच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केल आहे. "पोलीस तुमच्यासाठी आहेत, तुम्ही निःसंकोचपणे माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आपला सहकार्य मला खूप महत्वाचा आहे," असे नवनीत कॉवत यांनी सांगितले.
मस्साजोग प्रकरणाने बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. आरोपींच्या अटक होण्याची प्रतीक्षा सुरू असताना, नवनीत कॉवत यांचे नेतृत्व काय दिशा घेणार आहे, याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी पोलिसांसमोर असलेल्या आव्हानांना कसे सामोरे जाऊन, बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला सुरळीत ठेवतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.