नाशिक: नाशिक जिल्ह्यात रात्री 10 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात हे हादरे जाणवले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून त्याचा केंद्रबिंदू नाशिक शहरापासून सुमारे 53 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे.
भूकंपाचे हादरे नाशिक शहराबरोबरच सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण, चांदवड आणि देवळा या परिसरात जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. सप्तशृंगी गड परिसरातही नागरिकांना जमिनीच्या हालचाली जाणवल्या. ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरू असल्याने या घटनेमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
भूकंपाचा धक्का जाणवताच काही नागरिक घराबाहेर पडले. मात्र, सध्या या घटनेमुळे कोणत्याही मोठ्या जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भूकंपाच्या वेळी घरामध्ये असलेल्या नागरिकांनी खिडक्या, काचा, कपाटे तसेच जड वस्तूंपासून अंतर ठेवावे. शक्य असल्यास मजबूत टेबल किंवा अन्य सुरक्षित संरचनेखाली आसरा घ्यावा. हादरे सुरू असताना लिफ्टचा वापर करणे टाळावे. तसेच घाबरून जिन्यातून किंवा इमारतीबाहेर धावण्याचा प्रयत्न करू नये.
हादरे थांबल्यानंतर नागरिकांनी इमारतीपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेचा आधार घ्यावा. विजेच्या तारा, मोठी झाडे आणि धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांपासून अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.