Maharashtra Weather: पाऊस गेला, उकाडा आला! मुंबईत तापमानाचा पारा वाढला; पुढच्या आठवड्यात हवामान कसं असेल?

मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उकाडा आणि दमट वातावरणात वाढ झाली आहे. तापमान 33 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून कोकणासह राज्यातील अनेक भागांतही तापमान वाढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Maharashtra Weather: पाऊस गेला, उकाडा आला! मुंबईत तापमानाचा पारा वाढला; पुढच्या आठवड्यात हवामान कसं असेल?

मुंबई: मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला काही दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता हवामानात मोठा बदल जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, मुंबईकरांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सकाळपासूनच दमट हवेमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता असली तरी मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पाऊस कमी आणि आर्द्रता जास्त असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: BMC: फोटो काढा, लोकेशन पाठवा आणि तक्रार नोंदवा! BMC ने तक्रारींसाठी सुरू केला खास WhatsApp चॅटबॉट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वाहतूक विस्कळीत झाली होती आणि रेल्वे सेवेलाही काही प्रमाणात फटका बसला होता. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती सुधारत असली तरी दमट वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास होत आहे.

मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांमध्ये गेल्या 24 तासांत अत्यल्प पावसाची नोंद झाली. यामुळे मान्सून सक्रिय असला तरी त्याचा प्रभाव सध्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, जूनपासून आतापर्यंत मुंबईत सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.

मुंबईपुरतेच नव्हे तर कोकणातील अनेक भागांतही तापमानात वाढ झाली आहे. अलिबाग आणि डहाणू येथे कमाल तापमान 33 अंशांच्या पुढे गेले असून सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि विदर्भातील चंद्रपूरमध्येही उष्णतेचा प्रभाव वाढला असून राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये नोंदवले गेले.

हेही वाचा: Loan Waiver: बळीराजाला मोठा दिलासा! कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून थेट 'इतक्या' लाखांपर्यंत वाढवली; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम अजूनही रायगड जिल्ह्यातील मिठागरांवर दिसून येत आहे. समुद्राला आलेले उधाण, खाड्यांमधील भरती आणि तुटलेल्या संरक्षण बांधांमुळे मिठागरांमध्ये खारे पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवलेले मीठ भिजून नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी साठवून ठेवलेल्या भातालाही पावसाचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र मुंबईसह कोकणात सध्या मुसळधार पावसाची शक्यता कमी असून उकाडा आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळणे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच दैनंदिन नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version