Grandson Gold Theft for iPhone: यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कनकवाडी परिसरात महागड्या आयफोन मोबाईलची भुरळ पडल्याने एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्याच आजोबांच्या घरी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 62 वर्षीय बंडू बोढाले यांच्या घरातून 20 ते 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 52 ग्रॅम सोन्याचे दागिने गायब झाले होते. चोरीला गेलेल्या या मौल्यवान ऐवजाची एकूण किंमत 6 लाख 72 हजार रुपये इतकी आहे.
मित्रांच्या चुकीच्या सल्ल्याने अल्पवयीन मुलगा गुन्हेगारीच्या जाळ्यात
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संविधान चौकातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत अल्पवयीन नातवाने 'आयफोन 16 प्रो' खरेदी करण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली. मोबाईल घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने मित्र गुणवंत उर्फ पोलार्ड दानव (वय 23) आणि सुरज गेडाम (वय 25) यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याला समजावण्याऐवजी या मित्रांनी आजोबांच्याच घरात चोरी करण्याचा चुकीचा सल्ला देऊन त्याला प्रवृत्त केले.
हेही वाचा – Shocking News: जोडीदारासोबत वाद! 7 व्या मजल्यावरून पडून 23 वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी
कपाटाचे लॉकर उघडून सोन्याची चोरी; नागपूर-चंद्रपूरला पळून जाण्याचा बेत
मित्रांच्या चिथावणीनंतर अल्पवयीन नातवाने आजोबांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीने उघडून 52 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. 1 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हे दागिने विकून मोबाईल खरेदी करण्यासाठी आरोपी नागपूर किंवा चंद्रपूरच्या दिशेने पळण्याच्या तयारीत असतानाच 2 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
चोरीचा माल हस्तगत; एक आरोपी अद्याप पसार
वणी पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई करत अल्पवयीन मुलासह गुणवंत दानव याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 लाख 72 हजार रुपयांचे सर्व 52 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या गुन्ह्यात सामील असलेला दुसरा साथीदार सुरज गेडाम हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तरुणांमधील महागड्या वस्तूंचे आकर्षण आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची गुन्हेगारी प्रवृत्ती यावर या घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा – Crime News: बायकोसोबत प्रेमाने राहतो म्हणून Exगर्लफ्रेंड भडकली; तिने दुसऱ्या बॉयफ्रेंडच्या मदतीने केलं कांड!
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.