Amravati Municipal Corporation: महापौर-उपमहापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ; MIM नगरसेविकेचे महायुतीला मतदान

अमरावती महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी पक्षाचा व्हिप झुगारून महायुतीला मतदान केल्याने राजकीय खळबळ उडाली असून अपात्रतेची शक्यता निर्माण झाली आहे.
Amravati Municipal Corporation: महापौर-उपमहापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ; MIM नगरसेविकेचे महायुतीला मतदान

अमरावती महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. एमआयएम पक्षाला अमरावतीत मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी थेट महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेमुळे एमआयएममध्ये अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून, संबंधित नगरसेविकेवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती महानगरपालिकेत एमआयएमचे एकूण १२ नगरसेवक आहेत. महापौर व उपमहापौर निवडणुकीत पक्षाने सर्व नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घ्यावी, असा व्हिप जारी केला होता. मात्र, जुनी वस्ती प्रभाग क्रमांक २१, बडनेर येथील नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी पक्षाचा आदेश झुगारत महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केले. त्यांच्या या भूमिकेमुळे एमआयएमच्या रणनीतीला तडा गेला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे शहराध्यक्ष आणि गटनेते हाजी इरफान यांनी कडक भूमिका घेतली आहे. पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले असून, पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मीराबाई कांबळे यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत विकासाचा मुद्दा पुढे केला आहे. अमरावतीचा महापौर आणि उपमहापौर महायुतीचा होत असून, आपल्या प्रभागाचा विकास साधण्यासाठी सत्ताधारी गटासोबत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडून होणाऱ्या कारवाईची आपल्याला भीती नसल्याचे सांगत, आपण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version