पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा (म्हाडा)च्या विविध गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली परिसरातील मिळून 4,186 सदनिकांसाठी ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. या सदनिकांसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,33,885 अर्ज अनामत रकमेसह नोंदवले गेले आहेत.
ऑनलाईन संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता घेतली जाणार आहे. अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत करता येईल, तर RTGS/NEFT द्वारे भरणा 1 डिसेंबर 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येईल. कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक अडचणी आणि अनेक अर्जदारांकडून आलेल्या अतिरिक्त वेळेच्या मागणीनंतर मंडळाने ही शेवटची मुदतवाढ दिली आहे. वाढीव वेळापत्रकाची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
या सोडतीत चार प्रमुख श्रेणींचा समावेश आहे:
म्हाडा गृहनिर्माण योजना – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य: 1683 सदनिका
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य: 299 सदनिका
15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMRDA हद्द) – 864 सदनिका
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पुणे MC, PCMC व PMRDA) – 3222 सदनिका
गृहनिर्माण सोडतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही वाढीव मुदत मोठी संधी आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करून वेळेत अनामत रक्कम भरल्यास सोडतीत सहभाग निश्चित होईल. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना स्वतःच्या घराच्या स्वप्नाच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.