खंडेरायाच्या जेजुरीत रंगला असा ‘मर्दानी’ दसरा!

खंडेरायाच्या जेजुरीत रंगला असा ‘मर्दानी’ दसरा!

खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्धतीने मर्दानी दसऱ्याचं आयोजन केलं जातं. तब्बल 15  तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होतोय. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसऱ्याची खंडा तलवारीच्या मर्दानी खेळानंतर समारोप झाला. राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसर्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते,  शेकडो वर्षांपासून इथे सुरू असलेल्या 42 किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क होतात.

मल्हारी मार्तंड! जय मल्हार! जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण!… हे वैशिष्ट्य असते अवघ्या महाराष्ट्राला उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे. उभ्या महाराष्ट्रत जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला “मर्दानी दसरा” म्हणून ओळखलं जातं.

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 6च्या सुमारास हजारो भाविक आणि जेजुरीकरांच्या उपस्थितीत भंडारा खोबरं उधळत मल्हारीमार्तंडाच्या जयघोषात पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी निघाला. रमण्यात मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण असलेल्या कडेपठार मंदिरात उत्सवमूर्तींना आणून त्या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळा रात्री २च्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडला.

 पालखी जेजुरी गडावर आल्यावर रंगतात त्या मर्दानी खेळांच्या स्पर्धा.

वय वर्षं 12 ते वय वर्षं 60 पर्यंतचे भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.

तब्बल 42 किलोंची असणारी ‘खंडा तलवार’ एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची तसंच दाताने उचलून दाखवण्याची स्पर्धाच या ठिकाणी रंगते.

42 किलो वजनाची खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली होती. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते , अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. एवढंच नव्हे, तर गडावर जागरण गोंधळ सुद्धा घातला जातो आणि खंडेरायाचा जागर मांडला जातो.

शेकडो वर्षांची परंपरा जोपासत भक्तीमय वातावरणात, पिवळं सोनं अर्थात भंडारा उधळून , फटाक्यांच्या आतशबाजीत सलग १५ तास हा मर्दानी दसरा संपन्न झाला. जेजुरी नगरीला सुवर्णनागीरचे स्वरूप प्राप्त झालं होतं. या मर्दानी दसऱ्यानिमित्त “देवा तुजी सोन्याची जेजुरी”असाच प्रत्यय भाविकांना येतो….. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version