कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक शनिवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, मुंबईहून मडगावकडे धावणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल आठ तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
माहितीनुसार, मुंबईहून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी रात्री तांत्रिक अडचण निर्माण झाली. विशेषतः गाडीतील 3E एसी डब्यांमधील वातानुकूलन यंत्रणा अचानक बंद पडल्याने प्रवाशांना उकाड्याचा सामना करावा लागला. प्रवासादरम्यान एसी सेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त केला.
खेड स्थानकापासूनच या बिघाडाची सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गाडी रत्नागिरी स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत गाडी थांबवली आणि इंजिन बदलण्याचा निर्णय घेतला. सुमारे 25 मिनिटांच्या दुरुस्तीनंतर आणि तांत्रिक तपासणीनंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, तोपर्यंत गाडीला मोठा विलंब झाला होता.
मांडवी एक्सप्रेसच्या या विलंबाचे पडसाद संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर उमटले. परिणामी, इतर अनेक गाड्याही उशिराने धावल्या. विशेषतः मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावकडे जाणारी 10111 क्रमांकाची कोकण कन्या एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा तब्बल आठ तास उशिराने खेड रेल्वे स्थानकात दाखल झाली.
खेड स्थानकावर पहाटे 3.04 वाजता पोहोचण्याची वेळ असलेली कोकण कन्या सकाळी 11.10 वाजता स्थानकात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांना तासन्तास स्थानकावर थांबावे लागले. काही प्रवाशांचे पुढील प्रवासाचे नियोजनही कोलमडले.
या संपूर्ण प्रकारामुळे कोकण रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत तांत्रिक देखभाल अधिक सक्षम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून, सध्या गाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ॲपवर गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.