Maharashtra Weather Update: राज्यात सध्या हवामानाने अनपेक्षित वळण घेतलं असून नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. एका बाजूला मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत असताना दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसासह वादळी वारे आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत. या वाऱ्यांच्या परिणामामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या लाटा आणि दक्षिणेकडील आर्द्रतेचा संगम होत आहे. परिणामी महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होऊन पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत दिवसभर उष्णतेचा त्रास जाणवत असून नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडा वाढला आहे. मात्र, संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत असून हवामानात तात्पुरता बदल जाणवत आहे.
दरम्यान, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 29 मार्चपासून कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच 30, 31 मार्च आणि 1 एप्रिलदरम्यान राज्यभर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतीला बसत असल्याचं चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे पिकं जमिनीवर कोसळली असून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. जनावरांसाठी साठवलेला चारा देखील खराब झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
जालना जिल्ह्यातही काही भागात अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर संध्याकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बारामतीतही अशाच प्रकारे वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
राज्यात हवामानाचा हा बदल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.