महाराष्ट्र: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता हवामानात पुन्हा बदल होत असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 13 जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही वादळी सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात सर्वाधिक पावसाचा इशारा
सध्या सर्वाधिक लक्ष विदर्भाकडे आहे. अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, अकोला, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मराठवाड्यातही पावसाची शक्यता
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. याशिवाय जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जळगावला सलग दुसऱ्या दिवसाचा अलर्ट
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी आज आणि उद्याही येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अधूनमधून सरी
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सध्या कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी सरींची शक्यता कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात उष्णता वाढली असून अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे.
कोकणात अजूनही उघडीप
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील दोन दिवस कसे राहणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात उद्याही पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यानंतर काही भागांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक वातावरणीय बदलांमुळे काही ठिकाणी अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.