महाराष्ट्र: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही भागांसाठी ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथ्यांमध्ये आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे आणि रायगड जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी तसेच पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज
पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांसह काही भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यांमध्येही अलर्ट
नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर यांसह राज्यातील विविध भागांमध्येही पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. हवामानातील बदलामागे कमी दाबाचा पट्टा तसेच वातावरणातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक, काही भागात मात्र अडचणी
यंदा जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये पावसाने चांगली भरपाई केली असून ऑगस्टच्या सुरुवातीलाही पावसाची साथ कायम आहे. त्यामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळत आहे. अनेक धरणांतील पाणीसाठाही वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने काही पूल आणि कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने पुढील २४ तास महत्त्वाचे असल्याचे सांगत नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच वीजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.