सांगली: ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी पाऊस आणि संसार हेच संकट नव्हते, तर जमीन, कर्ज आणि निर्णयांपासून दूर ठेवले जाणे ही खरी वेदना होती. वडिलोपार्जित जमिनीबाबतचे सर्व अधिकार घरातील कर्त्या पुरुषांकडेच असायचे. कर्जबाजारीपणामुळे जमीन विक्रीचे निर्णय घेतले जात, मात्र त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत होता. या अन्यायकारक स्थितीत बदल घडवण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील हजारो महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळू लागला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना शेतीच्या मालकीत थेट सहभाग देणे हा आहे.
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून महिलांचे नाव नोंदवले जात असल्याने, आता कोणतीही जमीन त्यांच्या संमतीशिवाय विकता येत नाही. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष अभियानामुळे तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तहसीलदारांनी थेट गावांमध्ये जाऊन महिलांना योजनेची माहिती दिली आणि अर्ज प्रक्रियेत मदत केली.
अर्जदार खातेदाराच्या सहमतीने तलाठी स्तरावर महिलांचे नाव सातबारा उताऱ्यावर दाखल करण्यात येते. मंडळ निरीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर अधिकृतरीत्या सहहिस्सेदारीची नोंद होते. या प्रक्रियेमुळे आजअखेर सांगली जिल्ह्यात 10,408 महिलांची नावे जमिनीच्या मालकी हक्कात समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे महिलांना किसान सन्मान योजनेसारख्या सरकारी लाभांचा थेट फायदा मिळण्याचा मार्गही खुला झाला आहे.
तालुकानिहाय पाहता कवठेमहांकाळ तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, उद्दिष्टाच्या तब्बल 188 टक्के अंमलबजावणी झाली आहे. या तालुक्यातील 60 महसुली गावांमधील 1,347 महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. याशिवाय शिराळा, विटा, कडेगाव, जत आणि मिरज या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात महिलांची नावे सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्यात आली आहेत.
या योजनेचे सामाजिक परिणामही तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील एका प्रकरणात, कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू होता. महसूल विभागाने वेळीच हस्तक्षेप करत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवले. त्यानंतर जमीन सुरक्षित तर राहिलीच, शिवाय त्या शेतकऱ्याचे व्यसनही सुटले. लक्ष्मी मुक्ती योजना केवळ कागदावरील बदल न ठरता, अनेक कुटुंबांसाठी स्थैर्य आणि आत्मविश्वासाचा आधार बनत असल्याचे चित्र आज सांगली जिल्ह्यात दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.