जेट एअरवेजच्या नरेश गोयलला ईडी कोठडी

जेट एअरवेजच्या नरेश गोयलला ईडी कोठडी

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जेट एअरवेज या विमान कंपनीचा संस्थापक नरेश गोयल याला पीएमएलए न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. गोयलची कर्ज घोटाळा प्रकरणी ईडी कोठडीत रवानगी झाली आहे. कॅनरा बँकेकडून घेतलेले ५३८ कोटी रुपयांचे कर्ज गोयलने थकवले आहे.

ईडीने नरेश गोयलला शुक्रवार १ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात बोलावले होते. चौकशी केल्यानंतर ईडीने गोयलला रात्री उशिरा अटक केले. यानंतर शनिवार २ सप्टेंबर रोजी ईडीने गोयलला पीएमएलए न्यायालयात हजर केले. न्यायालयाने नरेश गोयलला ११ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.

अटक करण्याआधी ईडीने दोनवेळा नरेश गोयलला चौकशीसाठी बोलावले होते. पण गोयलने चौकशीला हजर होणे टाळले. अखेर शुक्रवारी गोयल चौकशीसाठी हजर झाला. कॅनरा बँकेने नरेश गोयल विरोधात कर्ज घोटाळा प्रकरणी नोव्हेंबर २०२२ मध्ये तक्रार नोंदवली होती. नरेश गोयल, गोयलची पत्नी अनिता यांच्यासह आणखी काही जणांविरोधात कॅनरा बँकेने फसवणुकीची तक्रार केली होती. या प्रकरणात सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नंतर ईडीने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने गोयल विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली.

महत्त्वाचे मुद्दे

१. जेटला कॅनरा बँकेकडून ८४८.८६ कोटी रुपयांचे क्रेडिट लिमिट मिळाले होते. पण कर्जाची ५३८.६२ कोटी रुपयांची थकबाकी असताना २९ जुलै २०२१ रोजी खाते फसवणूक श्रेणीत दाखल करण्यात आले.

२. सीबीआयने ५ मे रोजी नरेश गोयल, अनिता गोयल, जेटचे कार्यकारी अधिकारी गौरांग शेट्टी यांच्या घरांवर धाड टाकली. एकूण सात मालमत्तांच्या ठिकाणी तपास करण्यात आला.

३. सीबीआयच्या गुन्ह्याच्याआधारे ईडीने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नंतर ईडीने गोयल विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version