Instant Lemon Pickle: भारतीय स्वयंपाकघरात लोणच्याला एक खास स्थान आहे. जेवणात चव वाढवायची असेल, ताटात थोडा चटकदार पणा हवा असेल किंवा भूक वाढवायची असेल लोणचे हे काम उत्तमपणे करते. विशेषतः लिंबाचे लोणचे हे त्याच्या आंबट-गोड आणि हलक्या तिखट चवीमुळे अनेकांच्या आवडीचे असते. आज आपण अशाच एका खास आणि झटपट तयार होणाऱ्या ‘लिंबू क्रश लोणचे’ रेसिपीवर नजर टाकणार आहोत.
ही रेसिपी पारंपरिक लिंबाच्या लोणच्यापेक्षा खूप सोपी आणि जलद आहे. लिंबांचा नैसर्गिक आंबटपणा, साखरेचा गोडवा आणि तिखट- मसाल्याचा परफेक्ट समतोल या लोणच्याला अतिशय स्वादिष्ट बनवतो. खास बाब म्हणजे हे लोणचे तयार करायला वेळ नाही लागत आणि योग्य पद्धतीने साठवले तर ते वर्षभर टिकते.
लिंबू क्रश लोणचे खास का?
लिंबाची पेस्ट, तिखट, जिरे आणि साखरेपासून तयार होणारे हे लोणचे नेहमीच्या कापून ठेवलेल्या लिंबाच्या लोणच्यापेक्षा वेगळे लागते. यात लिंबाचा रस आणि साल दोन्ही एकत्र शिजत असल्यामुळे चव अधिक गोडसर आणि समतोल मिळते. शिवाय, हे जेवणाबरोबर, पराठ्यांसोबत किंवा भाकरीसोबतही खूप छान लागतं.
लिंबू क्रश लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
लिंबू – 1 किलो
साखर – अर्धा किलो (गूळ वापरला तरी उत्कृष्ट चव येते)
जिरे पूड – चवीप्रमाणे
लाल तिखट – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
साहित्य अगदी साधं असून घरात सहज उपलब्ध होतं. त्यामुळे अचानक पाहुणे आले किंवा काहीतरी चटकदार हवंय असं वाटलं तरी हे लोणचे त्वरीत बनवता येतं.
कृती : लिंबू क्रश लोणचे कसे बनवायचे?
सर्वात आधी लिंबू स्वच्छ धुऊन त्याचे पातळ काप करावेत. त्यातील बिया काढणे महत्त्वाचे, कारण बिया राहिल्यास लोणचे कडू होऊ शकते. काप केलेले लिंबू मिक्सरमध्ये हलकेच फिरवावेत पेस्ट प्रमाणे नाही, तर थोडे कण जाणवतील इतपत.
आता स्टीलचे भांडे घ्या. लोणचे बनवण्यासाठी नेहमी लोखंडी किंवा जर्मनचे भांडे वापरू नये, कारण त्यातून आंबटपणा वाढतो. गॅसवर भांडे गरम करत पेस्ट त्यात सोडा. त्यात मीठ, जिरेपूड आणि लाल तिखट मिसळा.
हे मिश्रण हलवत राहून काही मिनिटे शिजू द्या आणि नंतर त्यात साखर टाका. गूळ वापरत असाल तर त्याची चव आणखी उत्तम येते. मध्यम आचेवर साखर पूर्ण वितळेपर्यंत मिश्रण शिजवणे आवश्यक आहे. साधारण 15–20 मिनिटांत पाक जाडसर होऊ लागतो आणि लोणच्याचा रंग आकर्षक दिसायला लागतो.
मिश्रण तयार झाल्यावर ते पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर घट्ट झाकण असलेल्या काचेच्या बरणीत साठवा. योग्य प्रकारे साठवल्यास हे लोणचे सहज एक वर्ष टिकते. चव मात्र दिवसभरात आणखी छान जाते.
चव आणि आरोग्य दोन्ही फायदा
लिंबामध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हे लोणचे चविष्ट तर असतेच, पण प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि पचन सुधारण्यासही उपयुक्त ठरते.
रोजच्या जेवणाचा सोबती
भाकरी असो, पोळी असो किंवा साधे-सरळ दहीभात हे लिंबू क्रश लोणचे ताटात पडताच जेवणाची मजा दुप्पट होते. चटकदार चवीमुळे हे घराघरात खास लोकप्रिय होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.