पुण्यातील लोणीकाळभोर पोलिसांच्या कथित निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुकीची ओळख पटवल्यामुळे एका 66 वर्षीय निरपराध वृद्धाला तब्बल 88 दिवस येरवडा कारागृहात राहावे लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माहितीनुसार, लोणीकाळभोर पोलिसांनी अली उर्फ इकबाल जाफरी या वृद्धाला ‘शेखर पटेल’ असल्याचा संशय घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. मात्र, पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावणीदरम्यान संबंधित व्यक्तीचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणात त्यांना तब्बल 88 दिवस विनाकारण कारागृहात राहावे लागले.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, चुकीच्या अटकेमुळे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागलेल्या पीडित वृद्धाला शासनाकडून योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.