छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या आर्थिक वादातून 32 वर्षीय तरुणाची भररस्त्यात लोखंडी हातोडी आणि लाकडी दांड्याने डोक्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल नाक्याजवळील मदनी चौकात ही धक्कादायक घटना घडली. फरेस बिन अब्दुल अजिज अलकसेरी असे मृत तरुणाचे नाव आहे. फरेस हा पडेगाव परिसरात कुटुंबासह राहत होता. कामानिमित्त मित्रासोबत मदनी चौकात आलेला असताना त्याचे आरोपी आतेभाऊ अहमद खलील बादाम आणि अदनान खलील बादाम यांच्यासोबत जुन्या आर्थिक वादातून भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर अहमद बादाम याने लोखंडी हातोडीने फरेसच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. वार चुकवताना फरेसच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपी भावांना काही तासांतच अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.