अभिनेत्री प्रीटी झिंटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल केलेला छेडछाडीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केला आहे. त्यामुळे नेस वाडियांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रीती आणि वाडिया हे दोघेही चांगले मित्र होते. मात्र काही कारणांनी त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला.
२०१४ मध्ये प्रीती झिंटाने नेस वाडियांविरोधात छेडछाडीचे आरोप केले होते. ‘३० मे २०१४ रोजी पंजाब इलेव्हन किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरू असताना मला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेले पाहून नेसने तिकीट वाटपावरून टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांदेखत शिवीगाळ केली. त्यानंतर मी माझी जागा बदलली. सगळ्या टीम सदस्यांदेखत मला शिवीगाळ केली आणि असभ्य वर्तन केले. माझा हात खेचत माझा विनयभंग केला,’ असा आरोप प्रीतीने केला होता. नेस यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले होते.
मुंबई पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात नेसविरोधात दाखल केलेले आरोपपत्र-
आयपीसी कलम ३५४ नुसार हल्ला करणे,
कलम ५०६ नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा त्रास देणे,
कलम ५०९ नुसार विनयभंग करणे
मात्र, खटला सुरू होण्याआधीच नेस यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात ही याचिका केली. याप्रकरणी न्यायालयाने प्रीतीकडूनही उत्तर मागितले होते. दोघांनाही आपसांत वाद मिटवण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला होता.
अखेर नेसवरील खटला रद्द करण्यात आला आणि तो छेडछाडीच्या आरोपांतून मुक्त झाला. दरम्यान, न्यायालयाने दोघांनाही याप्रकरणावर मीडियाशी बोलण्यास मज्जाव केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.