FDA Ganeshotsav Rules: गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून वाटप करण्यात येणाऱ्या महाप्रसादाच्या सुरक्षेसाठी आणि गुणवत्तेसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंडळांना महाप्रसाद तयार करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या परवान्याची गरज नसली, तरी स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्नगुणवत्तेचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. जर महाप्रसादाचे कंत्राट कॅटरर्सला दिले असेल, तर त्या कॅटरर्सकडे वैध अन्न परवाना किंवा एफडीएची नोंदणी असणे बंधनकारक आहे. तसेच, महाप्रसादासाठी लागणारा सर्व कच्चा माल नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
अन्न विषबाधा टाळण्यासाठी साठवणूक आणि हाताळणीवर एफडीएची करडी नजर
उत्सवाच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणावर मिठाई, पेढे, खवा, बरफी आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. या काळात साठवणूक, हाताळणी अथवा वितरणात किंचितही निष्काळजीपणा झाल्यास अन्न विषबाधेची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी प्रसाद तयार करण्यापासून ते भाविकांना वाटप करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. उत्सवकाळात एफडीएचे अधिकारी विविध मंडळांना भेटी देऊन अचानक तपासणी करणार असून, सर्व गणेश मंडळांनी या तपासणीदरम्यान पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक जाहीर; सहआयुक्तांचे आवाहन
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा गुणवत्तेतील त्रुटींविषयी नागरिकांना कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे एफडीएचे सहआयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी सांगितले आहे. यासाठी एफडीआने 1800222365 हा विशेष टोल फ्री क्रमांक आणि https://complaints.mahafda.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच भाविकांच्या आरोग्याची सुरक्षा जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
FDA ने दिल्या आहेत या सूचना
– नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच महाप्रसादासाठीचा कच्चा माल खरेदी करावा.
– स्वयंपाकाची जागा स्वच्छ, नीटनेटकी आणि आरोग्यदायी असावी.
– प्रसादासाठी वापरली जाणारी भांडी स्वच्छ, झाकण असलेली आणि सुरक्षित असावीत.
– कच्ची, सडलेली किंवा खराब फळे, भाज्या वापरू नयेत.
– आवश्यक तेवढ्याच प्रमाणात प्रसाद तयार करावा.
– प्रसाद तयार करण्यासाठी आणि महाप्रसादाच्या ठिकाणी पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करावी.
– स्वयंसेवकांनी ॲप्रॉन, ग्लोव्हज, टोपी आदी सुरक्षा साधने वापरावीत.
– प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तीस त्वचारोग किंवा संसर्गजन्य आजार नसावा.
– खवा, मावा आणि दुग्धजन्य पदार्थ वापरताना विशेष काळजी घ्यावी.
– दूध व दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक 4 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात करावी.
– एफडीए अधिकारी तपासणीसाठी आल्यास आवश्यक सहकार्य करावे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.