छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका इंग्रजी शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाच वर्षांच्या मुलाला शाळेत झालेल्या मारहाणीबाबत सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठी गेलेल्या वडिलांवरच शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि त्यांच्या मुलाने लोखंडी खुर्चीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
माहितीनुसार, फिर्यादी सलमान शेख यांचा पाच वर्षांचा मुलगा सम्रान हा युनूस कॉलनीतील प्राईम मिनिस्टर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतो. काही दिवसांपूर्वी शाळेत असताना त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने सम्रानला चावा घेतल्याचा आणि पेन्सिलने डोळ्याजवळ जखम केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून कुटुंबीयांनी शाळेशी संपर्क साधला.
सुरुवातीला वर्गशिक्षिकेकडे याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पालकांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली. त्यानंतर शाळेकडून एका विद्यार्थ्याचे नाव सांगत त्याने हा प्रकार केल्याची माहिती देण्यात आली होती.
मात्र, 14 ऑगस्ट रोजी सलमान शेख पुन्हा शाळेत जाऊन संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा आग्रह धरला. याचवेळी वाद वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मुख्याध्यापक झिया अहमद शेख यांनी त्यांच्याशी वाद घालत मोबाईल हिसकावून घेतला, तर त्यांचा मुलगा फरहान याने जवळील लोखंडी खुर्ची उचलून सलमान यांच्या हातावर वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर जखमी सलमान यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मुख्याध्यापक झिया अहमद शेख आणि त्यांचा मुलगा फरहान यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच पालकांशी होणाऱ्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या प्रकरणात तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.