जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनाच्या आहारी गेलेल्या रुग्णाला त्यातून मुक्त करण्यासाठी असते. पण, रायगडमध्ये विचित्र प्रकार घडलाय. रायगडच्या खालापूर मुंबई-पुणे महामार्गाजवळ एका बंगल्यामध्ये बेटर फाऊंडेशनच्या वतीने व्यसनमुक्तीच्या नावाखाली एक केंद्र सुरु होते. या व्यसनमुक्ती केंद्रात ठिकठिकाणाहून जवळपास 40-50 रुग्णांनी प्रवेश घेतला होता.
व्यसनाच्या आहारी गेलेला भाऊ,पती किंवा मुलगा हा व्यसनातून मुक्त ह्वावा या हेतूने कुटुंबिय आपल्या पाल्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करतात. मात्र, या व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांसोबत गैरवर्तणूक केली जाते. व्यसनमुक्तीच्या नावाखाली रुग्णांना अमानुष मारहाण केली जाते. येथे रुग्णांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यांना सिगारेटचे चटके देऊन उलटे टांगले जाते.
एक महिला आपल्या पाल्ल्याला भेटण्यासाठी आली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर एकापाठोपाठ एक सर्वांनी रितसर तक्रार केली. या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांच्या विरोधात खालापुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कारवाईत या केंद्राचे संचालक आणि त्यांचा मुलगा तसेच, इतर पाच कार्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.