Devendra Fadanvis : ठाकरेंच्या त्या बंडखोर खासदारांना भाजपात यायचं होतं? फडणवीसांनी थेट हातच जोडले

ठाकरे गटातील सहाव्या खासदाराला महायुतीच्या बाजूने आणण्यात देवेंद्र फडणवीसांची भूमिका असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारताच फडणवीस यांनी हात जोडत प्रतिक्रिया देणे टाळले.
Devendra Fadanvis : ठाकरेंच्या त्या बंडखोर खासदारांना भाजपात यायचं होतं? फडणवीसांनी थेट हातच जोडले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी अलीकडेच पक्षाविरोधात बंड पुकारत स्वतंत्र गट स्थापन करण्याची भूमिका घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, या बंडामागे नेमकी कोणाची भूमिका होती, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या बंडखोरीनंतर संबंधित खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटासंदर्भात पत्र दिले. त्यानंतर ठाकरे गटाने आपल्या खासदारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देत व्हिप जारी केला होता. मात्र, बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. यानंतर ठाकरे गटाकडून या खासदारांवर जोरदार टीका करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या काही नेत्यांची इच्छा भाजपमध्ये प्रवेश करण्याची होती. मात्र, काही राजकीय चर्चेनंतर त्यांना थेट भाजपमध्ये न घेता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे, ठाकरे गटातील सहाव्या खासदाराला महायुतीच्या बाजूने आणण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याच संदर्भात प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला.

मात्र, या प्रश्नावर थेट उत्तर देण्याऐवजी फडणवीस यांनी हात जोडत प्रतिक्रिया देणे टाळले. त्यांनी कोणतेही स्पष्ट भाष्य न करता विषय टाळला. फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version