कोकणातील नाट्यकलेचा अमूल्य ठेवा ; दशावतार

सिंधुदुर्गात दशावतार लोकनाट्य परंपरा आजही भक्तिभावाने जिवंत; कलाकारांचं समर्पण आणि पारंपरिक मुखवट्यांतून विष्णूचे दशावतार रंगभूमीवर साकारले जातात.
कोकणातील नाट्यकलेचा अमूल्य ठेवा ; दशावतार

सिंधुदुर्ग:कोकणातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेली दशावतार ही पारंपरिक लोककला आजही तितक्याच जोशात आणि भक्तिभावाने सादर केली जाते. ही कला साधारणतः आठशे वर्षांपासून कोकणात अस्तित्वात आहे. विष्णूचे दहा अवतार रंगमंचावर साकारत या नाटकाने काळानुसार अनेक बदल स्विकारले, मात्र त्याचे आत्मिक मूल्य अजूनही जपले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्याच्या काही भागांमध्ये दशावतार नाटक विशेष प्रसिद्ध आहे.

पूर्वी दशावतार कलाकार खांद्यावर पेटी, वेशभूषा आणि मुखवटे घेऊन पायपीट करत नाटकाच्या ठिकाणी पोहोचत असत. त्या काळात रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा ही म्हणच या कलाकारांच्या जीवनशैलीचं प्रतीक बनली होती. आज प्रवासाची साधनं बदलली, कलाकार टेम्पो ट्रॅव्हलरने जातात, पण त्यांच्या कलेवरील प्रेमात आणि समर्पणात तसूभरही फरक पडलेला नाही. प्रत्येक कलाकार आपली भूमिका साकारण्यासाठी स्वतः रंगभूषा करतो, वेशभूषा तयार करतो आणि पारंपरिक मुखवटे घालून आपल्या अभिनयातून देवतेंचं सजीव रूप प्रेक्षकांसमोर उभं करतो.
 

हेही वाचा :राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी महत्वाचा निर्णय; मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषी दर्जा

दशावतार नाटकांमध्ये पूर्वी प्रामुख्याने पौराणिक कथा सादर केल्या जात. पण आजच्या काळात सामाजिक विषयांनाही त्यामध्ये स्थान दिलं जात आहे. आधुनिक प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, सीन बदल आणि काही ठिकाणी ट्रिक्स वापरून नाटक अधिक प्रभावी बनवलं जातं. पारंपरिक हार्मोनियम, तबला, झांज यांसारख्या वाद्यांचा वापर आजही नाटकात रंग भरतो. प्रत्येक युद्ध प्रसंग, भावनात्मक संवाद आणि भक्तिगीत प्रेक्षकांच्या मनावर गारुड करतं. कलाकारांचा अभिनय आणि नाट्यप्रवेश प्रत्येक वेळेस नव्यानं अनुभूती देतो.

या कलेचं वैशिष्ट्य म्हणजे नाटकाच्या आधी पेटाऱ्याची पूजा केली जाते, आरती होते आणि नंतर सर्व कलाकार एकत्र येऊन सामूहिक भोजन करतात. या प्रक्रियेमुळे कलाकारांमध्ये एकात्मता, आपुलकी आणि टीमवर्क वाढतं. रंगभूषा, नेपथ्य, आवाज याची तयारी करून शेवटी नाटक सादर केलं जातं आणि प्रेक्षकांकडून मिळणारं कौतुक आणि बक्षीस हेच त्यांचं खऱ्या अर्थाने समाधान असतं.

दुर्दैवाने इतक्या समृद्ध परंपरेला आज शासनाकडून फारशी साथ मिळालेली नाही. कलाकारांना मिळणारं मानधन अत्यंत तुटपुंजं असतं. त्यामुळे अनेक दशावतार कलाकारांना अन्य व्यवसाय किंवा नोकऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. वय वाढल्यावर भूमिका कमी होत जातात आणि शेवटी कलाक्षेत्रातून मागे हटावं लागतं. त्यामुळे दशावतार कलाकारांसाठी अधिक मानधन, विमा संरक्षण, आरोग्य विमा आणि पेन्शन योजना राबवण्याची गरज प्रकर्षाने जाणवते.

दशावतार ही केवळ एक नाट्यकला नाही, तर कोकणातील संस्कृतीचा आत्मा आहे. परंपरेच्या आधारावर आधुनिकतेची जोड देत, ही लोककला आजही तग धरून आहे. हे कलाकार म्हणजे कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचे जिवंत दूत आहेत . 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version