Tejas Express : हायस्पीड आणि आलिशान प्रवासाचे स्वप्न दाखवणारी 'मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस' सध्या आपल्या नावाप्रमाणे वेगवान राहिलेली नाही. तांत्रिक बिघाड, 3 ते 6 तासांचा विलंब आणि बंद पडलेली मनोरंजनाची साधने यामुळे ही ट्रेन आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रीमियम तिकीट दर भरूनही प्रवाशांना मिळणारी वागणूक दुय्यम दर्जाची असल्याने संताप व्यक्त होत असून, या गाडीच्या जागी 'वंदे भारत' चालवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वेळेचं गणित कोलमडलं!
रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, तेजस एक्सप्रेस (22119/22120) सीएसएमटीहून पहाटे 5:50 ला सुटून दुपारी 3 वाजता मडगावला पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही गाडी 3 ते 6 तास उशिराने धावत आहे. परतीच्या प्रवासात गाडी रात्री 12:30 ऐवजी पहाटे पोहोचत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
असुविधांचा पाढा
गाडीत केवळ 'चेअर कार' डबे असल्याने सलग 10-12 तास बसून राहणे प्रवाशांना कठीण जात आहे. विलंबाने प्रवास अधिकच लांबत असल्याने कंबरदुखी आणि शारीरिक थकवा वाढत आहे. या ट्रेनचे मुख्य आकर्षण असलेली 'इन्फोटेनमेंट' (एलईडी स्क्रीन) सुविधा सध्या बंद आहे, तरीही भाडे मात्र 'प्रीमियम' दरानेच वसूल केले जात आहे. दरम्यान, कोकण रेल्वेवरील ब्लॉक आणि देखभालीचे कारण देऊन प्रशासन हात झटकत आहे.
काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
रेल्वे संघटनांनी या समस्येवर 2 प्रमुख पर्याय सुचवले आहेत. यातील पहिली मागणी म्हणजे लांब पल्ल्याचा आणि विलंबाचा प्रवास लक्षात घेता गाडीला स्लीपर कोच जोडले जावेत. तसेच दुसरी मागणी म्हणजे तेजसऐवजी अधिक आधुनिक आणि सोयीस्कर 'वंदे भारत' एक्सप्रेस या मार्गावर सुरू करावी. जादा भाडे देऊनही जर बसूनच प्रवास करायचा असेल आणि तोही तासनतास उशिराने, तर अशा 'प्रीमियम' गाडीचा उपयोग काय? असा प्रश्न सामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.