मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, झाड पडणे, रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग प्रभावीत होणे असे प्रकार समोर येत आहे. आतापर्यंत झाड कोसळून आणि दरड किंवा घरे पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली असून त्यांनी नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत. आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत. त्यांचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे. लोकांनी सावध रहावं. शक्यतो प्रवास टाळावा. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचं वारं बघता त्यांनी टूरिजम टाळावं”, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
तसेच “निसर्गाच्या माध्यमातून एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या गोष्टी गंभीर आहेत. पण काल साधारणतः 50 किमी ताशी वारे वाहत होते. कालची घटना दु:खद आहे. पण काल जी इमारत पडली, ती बेकायदेशीर होती. त्या इमारतीमधील लोकं नाहीत, पण ती इमारत ज्या शेजारच्या झोपडीवर पडली, त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना गंभीर आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई-पुणे महामार्ग बंद आहे. या घटना आहेत त्या निसर्गामुळे निर्माण झालेल्या आहेत. संपूर्ण महापालिका, आपत्कालीन कक्ष पूर्ण पणे रस्त्यावर उतरून सामना करत आहे”. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.