मुंबई, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जय महाराष्ट्र न्यूज या प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी या लोकप्रिय कार्यक्रमात मुंबई – गोवा महामार्ग सुधारणार की नाही? अंतर्गत सुरू असलेल्या संवादात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रवक्ते गणेश खणकर यांनी दलालांना चोपा, खड्डयांना आम्ही जबाबदार नाही असे वक्तव्य केले. कार्यक्रमात मुंबई – गोवा महामार्ग आणि त्यावरील खड्डे या विषयावर चर्चा सुरू होती.
कोकणात भूसंपादन प्रक्रियेत अनेकदा कायदेशीर समस्या निर्माण होतात. व्यवहार प्रगतीपथावर असताना अचानक ४ – ५ नवे दावे येतात. मग नेमका वारसदार कोण हा पेच सोडवण्यात वेळ जातो. याच कारणामुळे मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यास वेळ लागत आहे, असे गणेश खणकर म्हणाले. तर भूसंपादनाला मुद्दाम दिरंगाई केली जात आहे आणि मोबदला देण्यास वेळ लावला जात आहे असा आरोप मनसेच्या हेमंत संभूस यांनी केला. भूसंपादन प्रक्रिया काही जण मुद्दाम हळू हळू होईल असा प्रयत्न करत असल्याचा आरोप हेमंत संभूस यांनी केला. यावर उत्तर देताना माहितीचा अधिकार या कायद्याचा वापर करा आणि हवी ती माहिती मागवा आपल्याला तथ्य कळेल, अशा स्वरुपाचे वक्तव्य गणेश खणकर यांनी केले. सरकार भूसंपादनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे करत आहे. आमचा प्रयत्न वेगाने भूसंपादन करण्याचा आहे. पण कायदेशीर पेच वाढत असल्यामुळे जास्त वेळ जात असल्याचे खणकर म्हणाले.
जाब विचारण्याचा नागरिक म्हणून तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही जरूर विचारा. आम्ही आहोत. आम्ही उत्तर द्यायला बांधील आहोत. पण तुम्ही दलालांचा विषय काढलात तर तुम्हाला जे दलाल दिसतील त्यांना चोपा आमचं तुम्हाला पूर्णपणे समर्थन आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे खणकरांनी जाहीरपणे कार्यक्रमात सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.