मुंबई: सुरांच्या विश्वात आज एक गूढ शांतता पसरली आहे. ज्या आवाजाने दशकेभर भावना, प्रेम, वेदना आणि उत्साहाला स्वर दिले, तोच आवाज आज कायमचा थांबला. महाराष्ट्राच्या सूरसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर दुःखाची सावली दाटून आली आहे. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आशा भोसले यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या आणि उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एकामागोमाग एक अवयव निकामी होत गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि अखेरीस त्यांचं निधन झालं. जीवनाच्या या अखेरच्या टप्प्यावरही त्यांनी जिद्दीने लढा दिला; पण नियतीसमोर प्रत्येकाला नतमस्तक व्हावंच लागतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते 2 या वेळेत लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली. त्यांच्या निरोपासाठी चाहत्यांची आणि कलावंतांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Asha Bhosle: आशा भोसले यांचं निधन कशामुळे झालं? जवळच्या व्यक्तीने सांगितलं खरं कारण
दरम्यान, त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक भावनिक क्षण पुन्हा समोर आला आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा बालपणीचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन निरागस मुली दिसतात, एक लता मंगेशकर आणि दुसऱ्या आशा भोसले. “बालपणीचे दिवस पण काय दिवस होते… दीदी आणि मी,” असं कॅप्शन देत आशाताईंनी स्वतः हा फोटो शेअर केला होता. आज तोच फोटो अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरत आहे.
आशा भोसले यांची नात झनाई भोसले हिने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना छातीच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं होतं. त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता आणि उपचार सुरू असल्याने त्या लवकर बऱ्या होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, नियतीचा खेळ वेगळाच ठरला आणि संपूर्ण देशाला शोकसागरात ढकलून गेला.
8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 पासून आपल्या गायन प्रवासाची सुरुवात केली. विविध भाषांमध्ये 12000 हून अधिक गाणी गात त्यांनी संगीतविश्व समृद्ध केलं. शास्त्रीय, पॉप, गझल, कॅब्रे अशा विविध शैलींमध्ये त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. आज त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या सुरांची अमरता काळाच्या पलीकडे घुमत राहील कारण काही स्वर कधीच मावळत नाहीत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.