Arun Tupe: सोशल मीडियाच्या दुनियेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लोकप्रिय रील क्रिएटर अरुण तुपे यांचे अचानक निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी ते त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे हे छत्रपती संभाजीनगर शहरातील बालाजी नगर परिसरात राहत होते. सकाळी घरात ते प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Kinshuk Vaidya: 'शाका लाका बूम बूम' फेम संजू झाला बाबा, घरी झालं चिमुकल्याचं आगमन
अरुण तुपे हे सोशल मीडियावर त्यांच्या विनोदी आणि वेगळ्या शैलीतील रील्समुळे प्रसिद्ध झाले होते. इंस्टाग्रामवर “कोण अरुण तुपे?” या नावाने त्यांचे अकाउंट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या अकाउंटवर सुमारे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स होते आणि त्यांनी तयार केलेल्या रील्सना लाखो व्ह्यूज मिळत असत. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची विशेष ओळख निर्माण झाली होती.
त्यांच्या व्हिडिओंमध्ये साधी भाषा, विनोदी प्रसंग आणि दैनंदिन आयुष्यातील अनुभव यांचा समावेश असायचा. त्यामुळे अनेकजण त्यांच्या कंटेंटशी सहज जोडले जात होते. सोशल मीडियावर ते नेहमी सक्रिय असायचे आणि चाहत्यांशी संवाद साधत असत.
विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर एक रील पोस्ट केली होती. त्या व्हिडिओवर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सना ते उत्तर देत असल्याचेही दिसत होते. त्यामुळे अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.
सध्या त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. काही प्राथमिक माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या आठवणी शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर आपल्या खास शैलीने ओळख निर्माण करणाऱ्या या तरुण रील स्टारच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.