अमरावती: राज्यात एकीकडे स्वयंघोषित भोंदू बाबा प्रकरणाची चर्चा सुरू असताना, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरातून समोर आलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याच्यावर गंभीर आरोप असून, त्याला न्यायालयाने 21 एप्रिल पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने मोबाईलमध्ये अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मोबाईल जप्त केल्यानंतर त्यातील अनेक डेटा आरोपीने डिलीट केल्याचे आढळले असून, आता सायबर विभागाच्या मदतीने तो डेटा पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे.
चौकशीत आरोपीने हा प्रकार मागील एक वर्षापासून सुरू असल्याची कबुली दिली आहे. परतवाडा, अमरावती, नागपूर आणि आसपासच्या भागांतील मुली या प्रकरणात पीडित असल्याचेही त्याने सांगितले आहे. आतापर्यंत सात पीडित मुलींची नावे समोर आली असून, मात्र अद्याप त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येण्याचे धाडस केलेले नाही.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पीडित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. “त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील आणि सुरक्षेची पूर्ण हमी दिली जाईल,” असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या घरावर अचलपूर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर चालवला आहे. आरोपीचे बांधकाम अवैध असल्याचा दावा करत ही कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी आमदार प्रवीण तारडे उपस्थित होते.
या प्रकरणात आरोपीचा संबंध एमआयएम पक्षाशी असल्याची चर्चा रंगत असताना, पक्षाच्या जिल्हाध्य शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीची सोशल मीडिया कामासाठी काही काळ नेमणूक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला त्या पदावरून काढण्यात आले होते. त्यामुळे त्याचा सध्या पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.