Iran War : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या दरम्यान अमेरिकन लष्कराला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) अंतर्गत इराणवर हल्ले करत असताना अमेरिकेने आतापर्यंत आपले चार महत्त्वाची लष्करी विमाने गमावली आहेत. ताज्या घटनेत, इराकच्या पश्चिम भागात अमेरिकेचे एक इंधन भरणारे विमान (KC-135 Stratotanker) कोसळले असून, या घटनेमुळे अमेरिकन गोटात चिंतेचे वातावरण आहे.
KC-135 स्ट्रॅटोटँकरचा भीषण अपघात
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम इराकवर मोहिमेवर असताना अमेरिकेचे KC-135 विमान कोसळले. हे विमान फायटर जेट्सना हवेतच इंधन पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असून त्यावर कोणत्याही शत्रूने हल्ला केलेला नाही. मात्र, दुसरीकडे 'इस्लामिक रेझिस्टन्स इन इराक' या सशस्त्र गटाने हे विमान आपणच पाडल्याचा दावा केला आहे. या मोहिमेत दोन विमाने होती, त्यापैकी एक सुरक्षित लँड झाले, तर दुसऱ्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.
कुवैतची मोठी चूक: 3 'F-15' फायटर जेट्स जमीनदोस्त
या युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत अमेरिकेला सर्वात मोठा फटका कुवैतमध्ये बसला होता. मोहिमेवर असलेल्या अमेरिकेच्या तीन F-15E Strike Eagle या प्रगत लढाऊ विमानांना कुवैतच्या एअर डिफेन्स सिस्टमने चुकून शत्रूचे विमान समजले. कुवैतच्या एका F/A-18 Hornet फायटर जेटने या अमेरिकन विमानांवर गोळीबार केला, ज्यात तिन्ही विमाने नष्ट झाली. सुदैवाने, या विमानांमधील सर्व 6 वैमानिक वेळेत इजेक्ट झाल्यामुळे (बाहेर पडण्यात यशस्वी झाल्यामुळे) सुरक्षित वाचले. ही घटना अमेरिकेसाठी या युद्धातील आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान ठरली आहे.
ड्रोनच्या आघाडीवरही अमेरिकेची पीछेहाट
लष्करी विमानांशिवाय अमेरिकेला ड्रोनच्या बाबतीतही मोठी हानी सोसावी लागली आहे. आतापर्यंत सुमारे 11 MQ-9 Reaper ड्रोन इराण किंवा त्यांच्या समर्थक गटांनी पाडले आहेत. हे ड्रोन प्रामुख्याने शत्रूच्या हद्दीत जाऊन हेरगिरी करण्यासाठी वापरले जातात. या ड्रोनची किंमत आणि त्यातील तंत्रज्ञान पाहता, इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोन नष्ट होणे ही अमेरिकेच्या गुप्तचर मोहिमांसाठी मोठी अडचण ठरत आहे.
हवाई युद्धासमोरील नवी आव्हाने
अमेरिकेने 28 फेब्रुवारी 2026 पासून इराणविरुद्ध युद्ध पुकारले आहे, मात्र तांत्रिक बिघाड आणि मित्र राष्ट्रांकडून होणारी 'फ्रेंडली फायर'ची चूक यामुळे अमेरिकेच्या लष्करी रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. KC-135 सारख्या विमानांचे नुकसान होणे म्हणजे अमेरिकन फायटर जेट्सची हवेत राहण्याची क्षमता कमी होणे होय. इराण-अमेरिका संघर्षात लष्करी विमानांचे हे नुकसान केवळ आर्थिक नसून धोरणात्मकदृष्ट्याही अमेरिकेला कमकुवत करणारे ठरत आहे.
हेही वाचा – US – Iran War: आखाती देशातील युद्धामुळे भारतावर डेटा संकट? होमुझ तणाव वाढल्यास इंटरनेट कोलमडण्याची शक्यता
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.