Air India Gross Misuse of Travel Policy : टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीच्या एअर इंडिया कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांकडून 'ट्रॅव्हल पॉलिसी'चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एअरलाइनच्या अंतर्गत तपासणीत तब्बल 4,000 हून अधिक कर्मचारी या घोटाळ्यात दोषी आढळले आहेत. कंपनीने आता या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्यांच्यावर मोठा दंड आकारला जात आहे.
असा झाला ट्रॅव्हल पॉलिसीचा गैरवापर
एअर इंडियामध्ये कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना (उदा. जोडीदार, पालक) वर्षाला निश्चित संख्येने मोफत किंवा सवलतीच्या दरात विमाने तिकिटे मिळण्याची 'लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन' (LTC) सुविधा दिली जाते. अंतर्गत चौकशीत असे समोर आले की, अनेक कर्मचाऱ्यांनी अनोळखी व्यक्तींना आपले नातेवाईक भासवून ही मोफत तिकिटे मिळवली. इतकेच नाही तर, काही कर्मचाऱ्यांनी ही मोफत मिळालेली तिकिटे बाहेरील व्यक्तींना चढ्या दराने विकून नफा कमावल्याचेही निष्पन्न झाले आहे. एअर इंडियामध्ये सध्या 24,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी सुमारे 16 टक्के कर्मचारी या गैरप्रकारात अडकले आहेत.
दोषी कर्मचाऱ्यांना दंड आणि वसुलीचे आदेश
गैरव्यवहाराचे हे प्रकरण मागील आर्थिक वर्षाशी संबंधित आहे. एअर इंडियाने आता या कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीद्वारे मिळवलेली रक्कम परत घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी नैतिकतेचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण (जानेवारी 2022) केल्यानंतर नियुक्त झालेल्या अनेक नवीन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या गैरप्रकारामुळे कंपनीला नेमके किती आर्थिक नुकसान झाले, याचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
हेही वाचा – Induction Buying Guide: LPG संकटात इंडक्शन घेताय? घाई नको, आधी 'हे' वाचा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
नियम झाले अधिक कडक
या घोटाळ्यानंतर एअर इंडियाने आपल्या 'एलटीसी' धोरणामध्ये तातडीने बदल केले असून नियम अधिक कडक केले आहेत. आता कोणत्याही कर्मचाऱ्याला सवलतीचा लाभ घेण्यासाठी नामांकित व्यक्तीसोबतच्या (Nominee) नात्याचा ठोस पुरावा कंपनीला सादर करावा लागणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया काहीशी शिथिल होती, ज्याचा फायदा घेत कर्मचाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केली. कंपनी आता आपल्या आचारसंहितेबाबत (Code of Conduct) कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
मिळणारे फायदे आणि मर्यादा
एअर इंडियाच्या धोरणानुसार, कर्मचाऱ्यांना एका आर्थिक वर्षात एकूण 14 हवाई प्रवासांची तिकिटे दिली जातात. यामध्ये 'ओपन-जॉ' तिकिटांचाही (सुरुवातीच्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून परतीचा प्रवास) समावेश असतो. मात्र, या सुविधेचा गैरवापर झाल्याने आता संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय कोणालाही ही तिकिटे दिली जाणार नाहीत. एअरलाइन सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या (Transformation Plan) टप्प्यात असताना अशा प्रकारचे अंतर्गत घोटाळे समोर येणे ही टाटा समूहासाठी चिंतेची बाब ठरली आहे.
हेही वाचा – Dairy Industry Crisis: आखाती युद्धाचा आता दुधावरही परिणाम, पुढच्या 10 दिवसांत दूध पुरवठा बंद होणार?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.