पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दत्तात्रय गाडेच्या भावाने आपली भूमिका मांडली. तसेच गाडेच्या वकिलाने देखील आपलं म्हणणं स्पष्ट केलं. यात त्यांनी, या प्रकरणावर न्यायालय निर्णय देईल. पण आरोपीची बाजू मांडत असल्यामुळे धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप वकील वाजिद खान यांनी केला. तर न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य असेल, असे दत्तात्रय गाडेच्या भावाने म्हटलं आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपीच्या बाजूने उभे राहणाऱ्या वकिलांना मोठ्या प्रमाणावर धमक्या मिळत असल्याचे वाजिद खान यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘आम्ही केवळ आरोपीची बाजू मांडत आहोत. तरीही सोशल मीडियावर आमच्या विरोधात पोस्ट आणि रिल व्हिडीओ बनवले जात आहेत. यामुळे आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज भासू लागली आहे.’
बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात कोणी वकील उभा राहू नये का? असा सवालही वाजिद खान यांनी केला. दत्ता गाडेचा भाऊ यानेही या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेतली.
भाजीपाला विकून येत असताना घटना घडली
दत्तात्रय गाडेचा भाऊ म्हणाला की, ‘आरोपी दत्ता गाडे गुलटेकडी भाजी मार्केट यार्डममध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. भाजीपाला विकून येत असताना स्वारगेट बस डेपोमध्ये सदर प्रकार घडला. आमचा पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पीडित महिलेला न्याय मिळायलाच हवा. न्यायालयाने जर माझ्या भावाला फाशीची शिक्षा दिली. तरी आम्हाला काही हरकत नाही. पण या प्रकरणाची निपक्षपणे सखोल चौकशी व्हायला हवी.’
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना खुशखबर! फेब्रुवारी हप्त्याच्या तारखेची घोषणा
गावातील लोकांचा आमच्याबाबत दृष्टीकोन बदलला
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने आम्ही त्याच्याशी फारसे संबंध ठेवले नव्हते. या प्रकरणापासून गावात आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गावकरी आमच्याशी संवाद साधायला टाळत आहेत. आम्हाला वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे, असे देखील दत्तात्रय गाडेच्या भावाने सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.