Nagpur नागपूर : क्रिकेटविश्वातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका 17 वर्षाच्या महिला क्रिकेटपटूने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना नागपूर येथे घडली असून नागपुरची 17 वर्षीय महिला क्रिकेटपटू अदिती चौकांडे हिची VCA (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
अदिती चौकांडे मूळची अकोला येथील असून गेल्या दोन वर्षांपासून आईसोबत नागपुरातील लक्ष्मी नगर परिसरातील उमालक्ष्मी अपारमेंट येथे चौथ्या माळ्यावर राहत होती. ती सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे कठोर प्रशिक्षण घेत होती. मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अदितीची अलीकडे विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) संघाच्या निवड प्रक्रियेत निवड झाली नव्हती.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, निवड न झाल्यामुळे ती मानसिक तणावात होती. निवड न झाल्याच्या नैराश्यातून या उदयोन्मुख खेळाडूने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण क्रीडा विश्वात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये "माझी निवड झाली नाही" असा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. बजाज नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच आत्महत्येचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.