जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठीच्या नावाने गळा काढणारे नगरसेवक मनपा शाळांबाबत मात्र महापालिकेत मूग गिळून गप्प असल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेतून समोर आलीय.
गेल्या चार वर्षांत महापालिका शाळांतील तब्बल 90 हजारांहून अधिक विद्यार्थी घटले आहेत. मुंबई मनपा शाळांतील पहिलीच्या वर्गात 2008-9 साली 63 हजार 392 विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, 2016-17पर्यंत त्यात घट होऊन आताही संख्या 32 हजार 218 इतकी खाली आलीय.
महापालिका शाळांतील एकूण विद्यार्थी संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2012-13 साली महापालिका शाळांत चार लाख 34 हजार 523 विद्यार्थी शिकत होते. मात्र, 2016-17 सालापर्यंत त्यात 90 हजार 902 विद्यार्थ्यांची घट होत ही संख्या तीन लाख 43 हजार 621 पर्यंत रोडावली आहे.
एकीकडे महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत असली, तरी दुसरीकडे शाळांसाठी असलेल्या महापालिका अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मात्र कमालीची वाढ झाल्याचे दिसते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.