छत्रपती संभाजीनगर, ९ मे २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरात तलवार घेऊन दहशत निर्माण करताना रंगेहाथ पकडलेल्या दोन गुंडांना ठाण्यात नेऊन बसवताच त्यांनी हातकडीसह ठाण्यातून पळाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके यांनी रात्री उशिरा छावणी परिसरातून दोघांना शस्त्रासह ताब्यात घेतले होते. पुढील कारवाईसाठी शेळके यांनी दोघांना छावणी पोलिस ठाण्यात हजर केले. दोघांना शस्त्र, आरोपींच्या कारसह कर्तव्यावर हजर सहायक फौजदार बन्सवाल यांच्या ताब्यात देऊन रितसर नोंद करुन निघून गेले. त्यानंतर बन्सवाल हे सहकारी कर्मचाऱ्यासह गुन्हा दाखल करण्यात व्यस्त असताना आरोपींनी लघुशंका आल्याचे नाटक केले. बन्सवाल यांनी मात्र दोघांची हातकडी काढून कुठल्याही सुरक्षेशिवाय बाथरुमच्या दिशेने पाठवले. दोघांनी मात्र ठाण्याच्या मागील बाजुने तत्काळ हातकडीसह पोबारा केला. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.