राष्ट्रवादी कुणाची ? आज आयोगासमोर सुनावणी

राष्ट्रवादी कुणाची ? आज आयोगासमोर सुनावणी

राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूट आणि बंडाळीनंतर पक्षात दोन गट पडले आहे. आमदार आणि खासदार दोन गटात विभागले असून अनेक नेते एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीवरील राजकीय वर्चस्वाची लढाई आजपासून सुरू होणार आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काकांना मिळणार की पुतण्याला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीतील शरद पवार गटाकडून जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे कायदेशीर बाजू मांडणार आहे. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल करण्यात आली आहे. याशिवाय अजित पवार गटाकडूनही निवडणूक आयोगात हजारोंच्या संख्येने शपथपत्रं दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निवडणूक आयोगात दोन्ही पवार गटात पक्षावरील वर्चस्वासाठी कायदेशीर सुनावणी सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी राष्ट्रवादी कुणाची? यावर निकाल देणार आहेत.

निवडणूक आयोगातील सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटांकडून बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. पक्षाचं चिन्हं गोठवण्यात आल्यास पुढील रणनीती काय असावी, यावर दोन्ही गटांकडून चर्चा करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या तुलनेत अजित पवार गटाच्या शपथपत्रांची संख्या फार कमी असल्याची माहिती आहे. तसेच बंडखोर गटाने काही मृत व्यक्तींचीही शपथपत्रं सादर केल्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवार गटाने निवडणूक आयोगात चार हजार शपथपत्रं दाखल केली आहे. त्यामुळं निवडणूक आयोगात होणाऱ्या आजच्या सुनावणीला दोन्ही गटातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version