Hema Malini: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडसह त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या निधनानंतर जे घडले, त्याने केवळ चाहत्यांनाच नव्हे तर सिनेसृष्टीतील अनेकांना प्रश्न पडला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दोन वेगवेगळ्या ठिकाणी शोकसभा घेण्यात आल्या. यामुळे कुटुंबातील जुन्या वादांच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं.
विशेष म्हणजे धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती काही काळ गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. या गोष्टीमुळेही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर काही दिवसांतच दोन वेगवेगळ्या शोकसभा झाल्याचं समोर आलं एक धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीच्या घरी आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या घरी. या निर्णयामागचं कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले.
अखेर धर्मेंद्र यांच्या निधनाला सुमारे 40 दिवस उलटल्यानंतर अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी यावर पहिल्यांदाच उघडपणे भूमिका मांडली. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की हा पूर्णपणे कौटुंबिक आणि खासगी विषय होता. “आम्ही कुटुंबात चर्चा करूनच हे निर्णय घेतले,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, त्यांच्या जवळच्या व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि प्रत्येकाचा भावनिक व सामाजिक वर्तुळ वेगळं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी स्वतंत्र प्रार्थना सभा आयोजित केली. “माझ्या घरी येणारे लोक वेगळे आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना सभा घेणं मला योग्य वाटलं,” असं त्यांनी सांगितलं.
याशिवाय त्यांनी दिल्ली आणि मथुरा येथेही प्रार्थना सभा आयोजित केल्याचं स्पष्ट केलं. “मी राजकारणात सक्रिय आहे. मथुरा हा माझा मतदारसंघ आहे. तिथले लोक धर्मेंद्र यांचे प्रचंड चाहते आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी प्रार्थना सभा ठेवणं माझं कर्तव्य वाटलं,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर आपण पूर्णपणे समाधानी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ज्या दिवशी सनी आणि बॉबी देओल यांनी मुंबईतील वांद्रे परिसरात शोकसभा ठेवली होती, त्याच दिवशी हेमा मालिनी यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सनी-बॉबी देओल यांना भेटल्यानंतर हेमा मालिनी यांच्याही घरी जाऊन त्यांचे सांत्वन करताना दिसले.
धर्मेंद्र यांच्या जाण्याने देओल कुटुंबासाठी ही नक्कीच मोठी भावनिक हानी आहे. दोन वेगवेगळ्या शोकसभांमागे मतभेद नसून परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांनुसार घेतलेला निर्णय होता, हेमा मालिनी यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.