North Cyprus Boat Accident : उत्तर सायप्रसच्या सागरी हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. सुमारे 250 हून अधिक, म्हणजेच जवळपास २७० प्रवाशांना घेऊन प्रवास करणारी एक मोठी नौका किरेनियाच्या किनाऱ्याजवळ अचानक समुद्रात उलटली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बोट किरेनिया बंदराहून तुर्कीतील तासुकूच्या दिशेने जात असताना अचानक तिच्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरण्यास सुरुवात झाली. प्रवाशांमध्ये घबराट पसरल्यानंतर काही वेळातच नौकेचा समतोल बिघडला आणि ती समुद्रात कलंडली. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
हवाई आणि सागरी मार्गाने युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर सायप्रस प्रशासनाने तातडीने व्यापक शोध आणि बचाव कार्य हाती घेतले आहे. तुर्की सायप्रस कोस्ट गार्डची विविध जहाजे, अत्याधुनिक बोटी आणि हेलिकॉप्टर्स आपत्कालीन मदतीसाठी समुद्रात तैनात करण्यात आले आहेत. बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी हवाई आणि सागरी दोन्ही मार्गांचा वापर केला जात आहे. या संकटाच्या वेळी स्थानिक नागरिकांनीही पुढे येत आपल्या खाजगी बोटी समुद्रात उतरवून मानवतेचे दर्शन घडवले आहे. समुद्रात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.
?A passenger ferry traveling from Girne to Taşucu in Türkiye’s Mersin province capsized after taking on water off the coast of Northern Cyprus on August 30. Coast Guard vessels, helicopters and civilian boats were deployed for rescue operations, while ambulances were placed on… pic.twitter.com/jlrTFygxFZ — Global Brief (@globalbrief_now) August 30, 2026
वैद्यकीय पथके सतर्क; रुग्णालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्था
समुद्रातून वाचवण्यात आलेल्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी किरेनिया (गिरने) बंदरावर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका आणि विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. स्थानिक रुग्णालयांनाही ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले असून आपत्कालीन कक्षांची रचना करण्यात आली आहे. अद्याप या दुर्घटनेत झालेल्या अधिकृत जीवितहानीबाबत अथवा बेपत्ता लोकांच्या अचूक आकडेवारीबाबत प्रशासनाकडून अंतिम दुजोरा मिळालेला नाही. वैद्यकीय यंत्रणा रुग्णांवर जलद उपचारासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
जास्तीत जास्त जीव वाचवणे हेच मुख्य ध्येय: महापौरांचे वक्तव्य
या दुर्दैवी घटनेवर किरेनियाचे महापौर मुरात शेंकुल यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि गंभीर असल्याचे सांगत, “सध्या आमचे संपूर्ण लक्ष समुद्रात अडकलेल्या जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढण्यावर केंद्रित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणा कोणत्याही परिस्थितीत परिस्थिती हाताळण्यासाठी कटिबद्ध असून, बचाव मोहीम पूर्ण होईपर्यंत सर्व यंत्रणा अखंडपणे कार्यरत राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.