Russian Crude Oil Imports: भारत आणि अमेरिका यांच्यातील कर व व्यापार तणावादरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यास सहमती दर्शविली असली, तरी अमेरिकेला एक महत्त्वाची अट घातली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, त्याला इराण आणि व्हेनेझुएला या प्रमुख तेल उत्पादक देशांकडून तेल खरेदी करण्यास परवानगी दिली गेली पाहिजे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे दोन्ही देशामधील संबंध ताणले जात आहेत. भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियन कच्चे तेल खरेदी करत आहे, या निर्णयाला अमेरिकेने वारंवार आक्षेप घेतला आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सांगितले आहे. यासाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त कर लादले आहेत. दरम्यान, भारताने रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु, यासाठी अमेरिकेसमोर एक अट देखील ठेवली आहे.
दरम्यान, भारताने म्हटलं आहे की, त्याला इराण आणि व्हेनेझुएला येथून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली पाहिजे. हे दोन्ही देश प्रमुख तेल पुरवठादार आहेत, परंतु अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. युक्रेन युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियाने स्वस्त तेल देण्यास सुरुवात केली आहे. भारत त्याच्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे 90 टक्के आयात करतो. म्हणून, रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी केल्याने भारताचे आयात बिल लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत झाली आहे.
इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, या आठवड्यात अमेरिकेला भेट देणाऱ्या एका शिष्टमंडळाने अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकींमध्ये ही विनंती पुन्हा केली. या चर्चेशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की जर भारताने रशिया, इराण आणि व्हेनेझुएला येथून एकाच वेळी तेल खरेदी करणे थांबवले तर जागतिक तेलाच्या किमती वाढू शकतात. तथापि, वाणिज्य आणि तेल मंत्रालयांचे प्रवक्ते आणि नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावास यांनी या विषयावर भाष्य केलेले नाही.
तथापी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी न्यूयॉर्क भेटीदरम्यान संकेत दिले की, भारत अमेरिकेकडून तेल आणि गॅस खरेदी वाढवू इच्छित आहे. 2019 मध्ये भारताने इराणकडून तेल खरेदी थांबवले होते, तर व्हेनेझुएलाकडून खरेदी रिलायन्स इंडस्ट्रीजने थांबवली होती. तथापी, 2022 मध्ये युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरू झाल्यापासून भारताने मॉस्कोकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत लक्षणीय वाढ केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.