Russia Bans Gasoline Export : रशियाने जागतिक ऊर्जा बाजाराला धक्का देत 1 एप्रिल 2026 पासून गॅसोलीन (पेट्रोल) निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारने देशांतर्गत पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य-पूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असताना रशियाने उचललेले हे पाऊल चीन आणि तुर्की सारख्या देशांसाठी मोठा फटका मानले जात आहे.
चीन आणि तुर्कीला बसणार आर्थिक फटका
रशिया दररोज सुमारे 1,20,000 ते 1,70,000 बॅरल गॅसोलीनची निर्यात करतो. चीन, तुर्की, ब्राझील, सिंगापूर आणि आफ्रिकन देश हे रशियन पेट्रोलियम उत्पादनांचे प्रमुख खरेदीदार आहेत. रशियाचे उप-पंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी स्पष्ट केले की, जागतिक बाजारपेठेत किमतीत मोठे चढ-उतार होत असताना देशांतर्गत ग्राहकांना दिलासा देणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे रशियन इंधनावर अवलंबून असलेल्या देशांना आता पर्यायी पुरवठादारांचा शोध घ्यावा लागणार आहे, ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येऊ शकतो.
भारतावर या निर्णयाचा काय परिणाम होणार?
रशियाच्या या बंदीचा भारतावर कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारत रशियाकडून प्रामुख्याने 'कच्चे तेल' (Crude Oil) आयात करतो, प्रक्रिया केलेले पेट्रोल नाही. भारताच्या एकूण रशियन आयातीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा वाटा केवळ 5 ते 7 टक्के इतकाच आहे. शिवाय, भारत हा जगातील सर्वात मोठ्या रिफायनर्सपैकी एक असून, स्वतः कच्चे तेल शुद्ध करून जगाला पेट्रोल विकतो. त्यामुळे रशियाने पेट्रोल निर्यात थांबवली तरी भारताची इंधन सुरक्षा धोक्यात येणार नाही.
देशांतर्गत साठ्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाची ग्वाही
मध्य-पूर्वेतील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विसकळीत झाली असली, तरी भारताकडे पुरेसा साठा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, "देशाकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून पुढील 2 महिन्यांचा पुरवठा आधीच सुनिश्चित करण्यात आला आहे." भारतीय रिफायनरी सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने किंवा त्यापेक्षाही जास्त वेगाने काम करत आहेत. तसेच, देशांतर्गत LPG उत्पादनात सुमारे 20 टक्के वाढ झाली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
जागतिक अनिश्चितता आणि भारताची सज्जता
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड, LPG आणि LNG च्या किमती वाढल्या असल्या तरी भारत सरकारने पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. रशियाने घेतलेला निर्णय हा त्यांच्या स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य देण्यासाठी आहे, तर भारत आपल्या धोरणात्मक साठ्याद्वारे (Strategic Reserves) परिस्थिती हाताळण्यास सज्ज आहे. मध्य-पूर्वेतील संकटामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय तेल कंपन्यांनी आधीच पावले उचलली असून, देशात पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा भासणार नाही याची खात्री प्रशासनाने दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.