Ramabai Ranveer Won Marathon : आईची जिद्द! हातात चप्पल, पायात टोचणारे रस्त्यावरचे खडे…, चक्क साडी नेसून धावली मॅरेथॉनमध्ये…पटकावला पहिला क्रमांक

Ramabai Ranveer Won Marathon : आईची जिद्द! हातात चप्पल, पायात टोचणारे रस्त्यावरचे खडे…, चक्क साडी नेसून धावली मॅरेथॉनमध्ये…पटकावला पहिला क्रमांक

बीड : ना पायात महागडे स्पोर्ट्स शूज… ना अंगावर ट्रॅकसूट… ना कोणत्याही प्रशिक्षकाचे मार्गदर्शन… मात्र हातात रोजच्या कष्टाची ताकद आणि मनात आपल्या दोन लेकींच्या उज्ज्वल भविष्याची जिद्द…! याच जिद्दीच्या जोरावर एका 47 वर्षीय आईने चक्क साडी नेसून आणि अनवाणी पायाने मॅरेथॉनमध्ये धावत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही प्रेरणादायी घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात.

हिंगोली येथून मुलींच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईत आलेल्या रमाबाई रणवीर या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वयंपाकाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी रमाबाई यांच्या खांद्यावर आली. अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक दरम्यान अमृत दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रमाबाई साध्या साडीत सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला इतर तरुण आणि तरुणी वेगाने पुढे निघून गेले. मात्र काही अंतर पार केल्यानंतर रमाबाई यांच्या पायातील स्लीपर निसटू लागल्याने त्यांनी स्लीपर हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली.

हेही वाचा : Lionel Messi : महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; भावनिक पोस्ट करत केली घोषणा

पावसाने गार झालेला रस्ता… पायाला टोचणारे खडे… आणि साडीचा पदर सांभाळत रमाबाई धावत राहिल्या. एकामागून एक ट्रॅकसूटमधील स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी थेट फिनिशिंग लाईनवर प्रथम धडक मारली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत रमाबाई रणवीर यांनी तीन हजार रुपयांचे बक्षीसही जिंकले. बक्षीस स्वीकारल्यानंतर रमाबाईंनी दिलेली प्रतिक्रिया मात्र उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. त्या म्हणाल्या…पोरांच्या संसारासाठी रोज धावपळ करते… आज स्वतःसाठी धावले. दरम्यान दोन मुलींच्या शिक्षणासाठी हिंगोली सोडून अंबाजोगाईत आलेली ही आई आज केवळ मॅरेथॉन जिंकली नाही, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर विजय मिळवता येतो, हेही तिने सिद्ध करून दाखवले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version