Passenger Disturbance in Flight: हजारो फूट उंचावर उड्डाण करत असलेल्या विमानात एका प्रवाशाने अचानक केलेल्या गोंधळामुळे इतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाईट 618 (Flight 618) मध्ये ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. हे विमान टेक्सास येथील डलास फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळाकडे चालले होते. फर्स्ट क्लास श्रेणीतून प्रवास करणाऱ्या या प्रवाशाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने विमानात अचानक आक्रमक पवित्रा घेतला.
विमानाचे बाल्टीमोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
उड्डाणादरम्यान या प्रवाशाचा गोंधळ इतका वाढला की विमानाची सुरक्षा धोक्यात आली होती. प्रवाशाला शांत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर वैमानिकाने सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचा मार्ग बदलला. विमान पुढे नेणे अशक्य झाल्यामुळे तातडीने बाल्टीमोर (Baltimore) विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एअर होस्टेसची समयसूचकता आणि डक्ट टेपची ट्रिक
विमान जमिनीवर उतरत असतानाही प्रवाशाचा गोंधळ थांबत नव्हता. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एअर होस्टेसने अत्यंत प्रसंगावधान दाखवत विशेष युक्ती वापरली. कर्मचाऱ्यांनी प्रथम त्या प्रवाशाच्या हातात प्लॅस्टिकच्या बेड्या (Plastic Cuffs) घातल्या. तरीही त्याची आक्रमकता कमी होत नसल्याने, त्याला हालचाल करता येऊ नये म्हणून डक्ट टेपच्या (Duct Tape) मदतीने त्याच्याच सीटवर घट्ट बांधून ठेवण्यात आले.
प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन करत उड्डाण पूर्ण
एअर होस्टेस आणि विमानावरील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मोठा धोका टळला. बाल्टीमोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आणि पोलिसांनी तातडीने विमानात प्रवेश करून त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, एअर होस्टेसच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.