पाकिस्तान: "गरज सरो आणि वैद्य मरो" ही म्हण पाकिस्तानला तंतोतंत लागू पडते. पैशांसाठी भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरणाऱ्या पाकिस्तानची अवस्था सध्या "खाईला काळ आणि भुईला भार" अशी झाली आहे. अगोदरच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि त्यातच इराण युद्धामुळे उद्भवलेले जागतिक तेल संकट, यामुळे पाकिस्तानचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. देशात लॉकडाऊनसारखी भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, हे युद्ध कसेबसे थांबवण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पण आश्चर्याची आणि संतापाची बाब म्हणजे, इतकी भयंकर परिस्थिती असताना आणि देश भिकेला लागलेला असतानाही पाकिस्तानचा 'माज' मात्र तसूभरही कमी झालेला नाही.
ज्या देशांनी पाकिस्तानला वाईट काळात मदतीचा हात दिला, आज त्यांच्याशीच गद्दारी करण्याची आणि त्यांच्यावरच गुरगुरण्याची वृत्ती पाकिस्तानने दाखवून दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीने (United Arab Emirates,UAE) बुडत्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दिलेले साडेतीनअब्ज डॉलरचे कर्ज परत मागताच, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही UAE कर्जाची मुदत वाढवून देईल, अशी भाबडी आशा पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर जमील अहमद लावून बसले होते. मात्र, अमिरातीने त्यांचा निर्णय न बदलल्याने आणि आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला नाईलाजाने हे कर्ज परत करण्याची घोषणा करावी लागली.
कर्ज फेडण्याची नामुष्की ओढवल्याने पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी, पाकिस्तानचे माजी मंत्री मुशाहिद हुसेन यांनी बेताल वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. "आम्ही कर्ज परत करण्याचा अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे, कारण सध्या UAE ला पैशांची नितांत गरज आहे. येमेन आणि सुदानसारख्या युद्धांमध्ये अडकल्यामुळे त्यांची अवस्था 'बिचाऱ्यांसारखी' झाली आहे," असा जावईशोध हुसेन यांनी लावला आहे. स्वतः दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगणारा देश जेव्हा मदत करणाऱ्यालाच 'बिचारा' म्हणतो, तेव्हा त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीची केवळ कीव करावीशी वाटते.
मुशाहिद हुसेन यांची मुक्ताफळे इथेच थांबली नाहीत, तर त्यांनी चक्क UAE ला 'अखंड भारता'ची भीती दाखवण्याचे धाडस केले आहे. अमिरातीच्या एकूण एक कोटी लोकसंख्येपैकी तब्बल 43 लाख लोक हे भारतीय वंशाचे आहेत, हा खरा आकडा पुढे करत हुसेन म्हणाले की, "UAE ने वेळीच सावध राहावे, अन्यथा भविष्यात ते 'अखंड भारता'चा भाग बनतील." स्वतःच्या देशाचे तुकडे पडण्याची वेळ आली असताना, दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाची आणि लोकसंख्येची चिंता करण्याच्या या पाकिस्तानी प्रवृत्तीला अज्ञानाचा कळस नाही तर दुसरे काय म्हणावे?
वस्तुस्थिती पाहता, UAE ने अचानक कर्ज परतफेडीची केलेली मागणी हे पाकिस्तानसाठी एखाद्या भयंकर दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, 3.5 अब्ज डॉलरची ही मोठी रक्कम देशाबाहेर गेल्यावर पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा रसातळाला जाईल आणि शहबाज शरीफ सरकारची कोंडी होईल. आजवर पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था चीन, सौदी अरेबिया आणि UAE च्या कर्जाच्या कुबड्यांवरच टिकून आहे. दरवर्षी हे देश कर्जाची मुदत वाढवून देतात म्हणून पाकिस्तानचा गाडा हाकला जातो. पण आता UAE ने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान खऱ्या अर्थाने आर्थिक उद्ध्वस्ताच्या उंबरठ्यावर उभा राहिला असून, हा माज त्यांना चांगलाच महागात पडणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.