Nepal Flood Dead Bodies Found in UP: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराचे भीषण परिणाम आता भारताच्या सीमावर्ती भागात पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील गंडक नदीत गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे सर्व मृतदेह नेपाळमधील पूरग्रस्त भागातून पाण्याचा प्रचंड वेग आणि प्रवाहासोबत वाहून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे उत्तर प्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यात मृतदेह आढळले
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या महाराजगंज आणि कुशीनगर या दोन जिल्ह्यांत हे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. गुरुवारी महाराजगंज जिल्ह्यात गंडक नदीच्या तीव्र प्रवाहात दोन महिलांसह 3 जणांचे मृतदेह आढळून आले. सशस्त्र सीमा बलाच्या (SSB) बचाव पथकाने मोटरबोटच्या साहाय्याने हे मृतदेह बाहेर काढून जिल्हा शवागारात पाठवले. यानंतर शुक्रवारी शेजारील कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा परिसरातील मदनपूर-शुक्रौली येथील बॅरेज पिलर क्रमांक 3 जवळ आणखी 3 मृतदेह तरंगताना आढळले, जे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) टीमने बाहेर काढले.
ओळख पटवण्यासाठी नेपाळ प्रशासनाशी संपर्क अन् नदीपात्रात वस्तूंचा ढीग
आढळून आलेल्या मृतदेहांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. या मृतदेहांचे तपशील आणि माहिती नेपाळ प्रशासनासोबत शेअर करण्यात आली असून, महापुरानंतर बेपत्ता झालेल्या नागरिकांशी यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. महापुराच्या पाण्यासोबत केवळ मृतदेहच नव्हे, तर वाहने, घरगुती सामान, गॅस सिलेंडर, लाकडी फर्निचर आणि ड्रम यांसारखा मोठ्या प्रमाणातील कचराही वाहून आला आहे. नदीकाठी या वस्तू गोळा करण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करत आहेत; मात्र, प्रशासनाने नागरिकांना जीव धोक्यात घालून नदीत न उतरण्याचे आवाहन केले आहे.
#WATCH | Khushinagar, UP | Three bodies were recovered from the Gandak River in Uttar Pradesh's Maharajganj district after being swept downstream by strong currents from devastating flash floods in Nepal Additional District Magistrate Vaibhav Mishra says, "Following the… pic.twitter.com/dN4Py3Mj0Y — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 27, 2026
हेही वाचा – Nepal Flood: आधी मदत नाकारली; आता नेपाळच्या बचावकार्यासाठी भारताचे ‘हे’ विशेष पथक काठमांडूत दाखल
भोटेकोशी ते त्रिशूली अन् गंडक नदीतील पाण्याचा प्रवाह
नेपाळमधील रसुवा प्रदेशात 26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे या आपत्तीला सुरुवात झाली. तिबेटमधून उगम पावणारी भोटेकोशी नदी त्रिशूली नदीला मिळते आणि पुढे जाऊन ती भारतात ‘गंडक’ या नावाने ओळखली जाते. या नदीप्रणालीच्या माध्यमातून पुराचे पाणी आणि अवशेष थेट भारतीय हद्दीत पोहोचले आहेत. नेपाळमध्ये या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेपत्ता आहेत.
सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा आणि गस्त वाढवली
गंडक नदीतील पाण्याच्या वेगामुळे आणखी मृतदेह किंवा अवशेष वाहून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजगंज आणि कुशीनगर प्रशासनाने नदीकाठच्या भागात हाय अलर्ट जारी केला आहे. एसएसबी (SSB), एसडीआरएफ (SDRF) आणि स्थानिक पोलिसांची पथके नदीकाठच्या भागात सतत नजर ठेवून आहेत. सध्या नदीतील पाण्याचा स्तर काहीसा ओसरला असला, तरी संभाव्य धोका लक्षात घेता किनारपट्टीवरील गावांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – Nepal Floods : महापुराचे भीषण वास्तव! शवागरे पडताहेत अपुरी; रिकाम्या इमारती अन् ‘ड्राय आईस’चा आधार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.