विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे . मात्र नाशिक आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा तिढा अजून सुटलेला नाही. नाशिकच्या जागेसाठी भाजप नेमका कोणाला पाठिंबा देणार याची चर्चा आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यावर ठाकरे गटाने शुभांगी पाटील सूर्यवंशीयांना पाठिंबा दिलाय. काँग्रेस राष्ट्रवादीनेही आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी शुभांगी पाटील सध्या प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत. यातले किती जण माघार घेतात त्यावर सत्यजित तांबे यांचं भवितव्य अवलंबून आहे.
बंडाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. तर सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सत्यजित तांबे हे आपला अर्ज माघारी घेणार की, इतर पक्षाच्या पाठिंब्यानं निवडणूक लढवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पाठिंबा कोणाला देणार याबाबत अद्यापही पक्षाची भूमिका गुलदस्त्यात आहे.
दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन हे नाशिक पदवीधर निवडणुकीची सुत्र हलवणार आहेत. सध्या तरी नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी थेट लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.