Hospital Fire : हृदयद्रावक घटना! रुग्णालयात AC कॉम्प्रेसरच्या स्फोटाने लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा अंत

प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध माहितीनुसार, वॉर्डातील एसी कॉम्प्रेसरचा जोरदार स्फोट झाल्यामुळे ही भीषण आग पसरली.
Hospital Fire : हृदयद्रावक घटना! रुग्णालयात AC कॉम्प्रेसरच्या स्फोटाने लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा अंत

Hospital Fire : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका प्रमुख शासकीय रुग्णालयात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. 'पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (PIMS) या रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील (गायनेकोलॉजी वॉर्ड) एनआयसीयू (NICU) मध्ये अचानक आग लागल्यामुळे तब्बल 15 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध माहितीनुसार, वॉर्डातील एसी कॉम्प्रेसरचा जोरदार स्फोट झाल्यामुळे ही भीषण आग पसरली. अवघ्या काही मिनिटांत आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पसरल्याने निष्पाप बालकांना वाचवण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही.

सकाळी 7 वाजता तिसऱ्या मजल्यावर काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी 7 च्या सुमारास रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्त्रीरोग विभागात घडली. 'जिओ न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या वेळी हा भीषण स्फोट आणि आग लागली, त्या वेळी एनआयसीयू नर्सरीमध्ये एकूण 16 नवजात बालके उपचारासाठी दाखल होती. आगीची तीव्रता आणि धुराचे लोट इतके भयानक होते की बचाव पथकाला तातडीने आत पोहोचणे अत्यंत कठीण झाले. अथक प्रयत्नांनंतर 16 पैकी केवळ 1 बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर उर्वरित 15 चिमुकल्यांचा होरपळून आणि गुदमरून करूण अंत झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या आपल्या बाळांचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून पालकांवर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अग्निशमन दलाची तत्परता आणि कूलिंग ऑपरेशन

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली. मदत व बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 4 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर परिसरात 'कूलिंग ऑपरेशन' सुरू करण्यात आले. वॉर्डातील इतर रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले, तरी नवजात बालकांच्या विभागातील जीवितहानीमुळे रुग्णालयात प्रचंड घबराट आणि शोकाकुल वातावरण पसरले होते.

हेही वाचा – Landslide : मोशी दुर्घटनेपेक्षाही भीषण! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर कोसळून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे बचावकार्य सुरू

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि सुरक्षा त्रुटींचा तपास

या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत. आगीचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी आणि रुग्णालयातील आग प्रतिबंधक सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी किंवा निष्काळजीपणा होता का, याची सखोल तपासणी करण्यासाठी एका विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखभाल आणि आपत्कालीन सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version