Driving Licence Point System: भारतातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार अत्यंत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर चाप लावण्यासाठी 'ग्रेडेड पॉईंट सिस्टीम' (Graded Point System) लागू केली जाणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) 66 व्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आता केवळ दंडाचे चलन फाडून सुटका होणार नसून, प्रत्येक नियमाच्या उल्लंघनाची थेट नोंद चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्स रेकॉर्डशी जोडली जाणार आहे.
'पॉईंट सिस्टीम' कशी करेल काम? लायसन्स कधी होणार रद्द?
या प्रस्तावित प्रणालीनुसार, जेव्हा एखादा चालक वेगमर्यादा ओलांडणे (Over Speeding), सिग्नल तोडणे किंवा इतर धोकादायक कृत्य करेल, तेव्हा त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्समधून ठराविक पॉईंट्स वजा केले जातील. पेनल्टीचे हे पॉईंट्स एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यास वाहतूक विभागाला संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स तात्पुरते निलंबित करण्याचा किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार असेल. चालकांच्या बेजबाबदार वर्तनाला चाप लावण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
नियमांचे पालन करणाऱ्या चांगल्या चालकांना मिळणार बक्षीस
विशेष म्हणजे, ही नवी यंत्रणा केवळ शिक्षेपुरती मर्यादित नसून नियमांचे पालन करणाऱ्या जबाबदार चालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्या वाहनचालकांचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ असेल, त्यांना विविध इन्सेंटिव्ह्स आणि प्रोत्साहनपर बक्षीसे दिले जातील. अशा सुरक्षित चालकांना वाहन विमा (Vehicle Insurance) नूतनीकरण करताना विशेष सवलती मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित ड्रायव्हिंगची सवय लागेल.
रस्ते सुरक्षेसाठी चालकांच्या वर्तनावर थेट लक्ष ठेवण्याचे आव्हान
रस्त्यांवरील अपघातांना लगाम घालण्यासाठी चालकांच्या मानसिकतेत आणि वर्तनात सुधारणा करणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे नितीन गडकरी यांनी नमूद केले. केवळ दंड आकारल्याने चालक गंभीर होत नसल्याने आता त्यांची प्रत्येक चूक डिजिटल पद्धतीने ट्रॅक केली जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.